बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 14

1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.

2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?

3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.

4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?

5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.

6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.

7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0