बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 92

1 परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.

2 सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.

3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.

4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.

5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.

6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,

7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.

8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.

9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.

10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.

11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.

12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.

14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.

15 हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0