बायबल · Indian Revised Version (Marathi)

स्तोत्रसंहिता 64

1 हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.

2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,

3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.

4 याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;

5 ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?

6 ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.

7 परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.

8 त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.

9 सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.

10 परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.

Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0