बायबल · Indian Revised Version (Marathi)
स्तोत्रसंहिता 6
1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
Indian Revised Version (Marathi) — © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions — CC BY-SA 4.0